वसईतील आगाशी गावातील ‘ एकता ‘ पतपेढी ही आपल्या आर्थिक विकासासोबतच सामाजिक कामासाठी संपूर्ण वसई तालुका व पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. नुकताच ‘एकता ‘ पतपेढीच्या बहुउद्देशीय मुख्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विवेक पंडित सोबतच वसई, नालासोपाराचे आमदार व पालघरचे खासदार तसेच हिंदुजा हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले.
आशीर्वाद विधीसाठी वसईचे बिशप थॉमस डिसोजा हजर होते. वसईतील हजारो हितचिंतक व ग्राहक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वसईमध्ये किंबहुना पालघर जिल्ह्यात एखाद्या पतपेढीची पाच मजली इमारत उभारण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. इतकं मोठं यश मिळवणाऱ्या ‘ एकता ‘ पतपेढीला शुभेच्छा देण्यासाठी वसई, पालघर व मुंबईतून अनेक प्रख्यात व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हजर राहून ‘ एकता ‘ पतपेढीच्या संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या.
पतपेढीचा तळमजला हा विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. पहिला मजला हे पतपेढीचे विविध विभाग जसे कर्ज विभाग, एच. आर. विभाग, वसुली विभाग, मार्केटिंग विभाग, बिझनेस डेव्हलपमेंट विभाग, कॉन्फरन्स हॉल अशा विविध कामासाठी उपलब्ध आहे.
पतपेढीचा दुसरा मजला हा वसईची व महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा सांस्कृतिक दालन असेल. तिसरा, चौथा व पाचवा मजला हा भविष्यात आरोग्य व आरोग्याची समस्या लक्षात घेता ‘ एकता ‘ तर्फे सुसज्ज हॉस्पिटल बनवण्याचे नियोजन आहे.
‘ एकता ‘ पतपेढीचे अध्यक्ष श्री. फ्रान्सिस लोपीस यांनी ‘ एकता ‘ पतपेढीच्या मुख्यालयाचे उद्घाटन करताना सर्व ग्राहक व हितचिंतकांना आश्वासित केलं. ‘ एकता ‘ पतपेढीचा व्यवसाय हा २०० कोटी वरून लवकरच ५०० कोटी पर्यंत नेताना ग्राहकांना नॅशनल बँकासारख्या सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर असणार. याशिवाय उपक्रमासोबतच ग्राहकांना पतपेढी व बँकिंग संदर्भात अधिक माहिती मिळावी म्हणून प्रशिक्षण शिबिर, मेळावे एक्सपोजर विजिट, आदी बाबत नियोजन आहे. आपल्या सर्वांच्या सहयोगाने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने ‘ एकता ‘ पतपेढी भविष्यातील महाराष्ट्र व भारतातील एक प्रमुख आदर्श निर्माण करणारी व प्रेरणा देणारी पतसंस्था असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






























